अभंग

आह्मी जातों आपुल्या गांवा

संत तुकारामांचा अभंग.

आह्मी जातों आपुल्या गांवा ।
आमुचा रामराम घ्यावा ॥१॥
तुमची आमची हे चि भेटी ।
येथुनियां जन्मतुटी ॥ध्रु.॥
आतां असों द्यावी दया ।
तुमच्या लागतसें पायां ॥२॥
येतां निजधामीं कोणी ।
विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥३॥
रामकृष्ण मुखीं बोला ।
तुका जातो वैकुंठाला ॥४॥

आपल्या गावाला जातो, रामराम घ्या, असे निरोपाचे बोल आहेत. ही भेट येथून जन्म तुटण्याची आहे. आता दया असू द्यावी, पाया लागतो. निजधामी जाताना वाणीने विठ्ठल विठ्ठल बोला. रामकृष्ण मुखी बोला. तुका वैकुंठाला जातो.

- संत तुकाराम