अभंग

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा

संत नामदेवांचा अभंग.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
सांग पंढरीराया काय करू यासी ।
का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
कीर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥

देवाचे नाव अमृताहून गोड आहे, तरी मन ते घेत नाही, अशी नामदेवांची तक्रार आहे. पंढरीराया, या मनाचे काय करू. तुझे रूप ध्यानात येत नाही. कीर्तनात बसलो की झोप येते, आणि मन विषयसुखात गुंतलेले असते. हरिदास नामाची कीर्ती गर्जतात, पण माझ्या चित्तात नाम येत नाही, असे ते म्हणतात.

- संत नामदेव