अभंग

देवा तुझा मी सोनार

संत नरहरी सोनारांचा अभंग.

देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥१॥
देह बागेसरी जाण ।
अंतरात्मा नाम सोनें ॥२॥
त्रिगुणाची करुनी मूस ।
आंत ओतिला ब्रह्मरस ॥३॥
जीव शिव करुनी फुंकी ।
रात्रंदिवस ठोकाठोकी ॥४॥
विवेक हातवडा घेऊन ।
काम क्रोध केला चूर्ण ॥५॥
मनबुद्धीची कातरी ।
रामनाम सोनें चोरी ॥६॥
ज्ञान ताजवा घेउन हाती ।
दोन्ही अक्षरें जोखिती ॥७॥
खांद्या वाहोनी पोतडी ।
उतरला पैलथडी ॥८॥
नरहरी सोनार हरीचा दास ।
भजन करी रात्रंदिवस ॥९॥

नरहरी देवांना सांगतो, मी तुझा सोनार आहे, आणि माझा व्यवहार तुझ्या नामाचा आहे. देह बागेसरी आहे, अंतरात्मा हे नामरूपी सोने आहे. त्रिगुणाची मूस करून ब्रह्मरस ओतला आहे. जीव आणि शिव ही फुंकी आहे, रात्रंदिवस ठोकाठोकी चालली आहे. विवेकाच्या हातोड्याने काम आणि क्रोध चूर्ण केला आहे. मन आणि बुद्धी ही कातरी आहे, रामनाम हे सोने आहे. ज्ञानाचा ताजवा हाती घेऊन दोन्ही अक्षरे जोखली आहेत. खांद्यावर पोतडी वाहून पैलथडी उतरला. नरहरी म्हणतो, हरीचा दास रात्रंदिवस भजन करतो.

- संत नरहरी सोनार