त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं ।
चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥१॥
नामासी विन्मुख तो नर पापिया ।
हरीविण धांवया न पावे कोणी ॥२॥
पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
नामें तिन्ही लोक उद्धरती ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें ।
परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥
त्रिवेणीच्या संगमात आणि नाना तीर्थांत हिंडले, तरी चित्त नामात नसेल तर ते हिंडणे व्यर्थ आहे. नामाला पाठ फिरवणारा पापी आहे. हरीवाचून त्याला धावायला जागा नाही. वाल्मीकीने सांगितले, नामाने तिन्ही लोक उद्धरतात. ज्ञानदेव म्हणतात, हरीचे नाम जपावे. त्या नामाची परंपरा कुळ शुद्ध करते.
- संत ज्ञानेश्वर