अभंग

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी

ज्ञानदेवांचा हरिपाठ १४.

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी ।
कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्णीं वाचा अनंतराशी तप ।
पापाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
पाविजे उत्तम निज स्थान ॥४॥

ज्याचा हरिपाठ नित्य आहे, सत्य आहे आणि मोजून आहे, त्याच्याकडे कळिकाळ दृष्टी वळवत नाही. रामकृष्णाचा उच्चार अनंत तप आहे. पापांचे कळप त्यापुढे पळतात. हरि हरि हरि हा शिवाचा मंत्र आहे. जो वाचेने म्हणतो त्याला मोक्ष आहे. ज्ञानदेवांचा पाठ नारायणाचे नाम आहे, आणि त्यामुळे उत्तम निजस्थान पावले जाते.

- संत ज्ञानेश्वर