अभंग

नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी

ज्ञानदेवांचा हरिपाठ १९.

नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥१॥
अनंत जन्मांचें तप एक नाम ।
सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥२॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया ।
गेले ते विलया हरिपाठी ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म ।
हरीविण नेम नाहीं दुजा ॥४॥

नामसंकीर्तन ही वैष्णवांची जोडी आहे. त्यांची अनंत कोटी पापे गेली. अनंत जन्मांचे तप एका नामात आहे, आणि हरिपाठाने सगळे मार्ग सुगम होतात. योग, याग, क्रिया, धर्म, अधर्म आणि माया हरिपाठात विलीन होतात. ज्ञानदेव म्हणतात, यज्ञ आणि धर्म हरीवाचून दुसरा नेम नाही.

- संत ज्ञानेश्वर