अभंग

जप तप कर्म क्रिया नेम धर्म

ज्ञानदेवांचा हरिपाठ २४.

जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात ।
भज कां त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेव ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥

जप, तप, कर्म, क्रिया, नेम आणि धर्म या सगळ्याच्या ठायी राम आहे, भाव शुद्ध असेल तर. हा भाव सोडू नये. संदेह टाकावा, आणि रामकृष्णाचा टाहो नित्य फोडावा. जात, वित्त, गोत्र आणि कुळशील मागे पडतात. भावाने भजणारा लवकर पावतो. ज्ञानदेवांच्या ध्यानात रामकृष्ण आहे. वैकुंठभुवनी घर केले आहे.

- संत ज्ञानेश्वर