एक तत्त्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणिक पंथा जाशील झणी ॥३॥
ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरी जपे सदा ॥४॥
एक तत्त्व, हे नाम, मनात दृढ धरावे. हरीची करुणा येईल. रामकृष्ण गोविंद हे नाम सोपे आहे. आधी वाचेने सद्गदित होऊन जपावे. नामापलीकडे दुसरे तत्त्व नाही. आणखी पंथाने वाया जाल. ज्ञानदेव म्हणतात, अंतरी जपमाळ धरून श्रीहरी सदा जपावा.
- संत ज्ञानेश्वर