अभंग

योग याग विधी येणें नोहे सिद्धि

ज्ञानदेवांचा हरिपाठ ५.

योग याग विधी येणें नोहे सिद्धि ।
वायांचि उपाधि दंभधर्म ॥१॥
भावेंवीण देव न कळे निःसंदेह ।
गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त ।
गुजेवीण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरणोपाय ॥४॥

योग, याग आणि विधि यांनी सिद्धी होत नाही. ते दंभाचे धर्म आहे. भावावाचून देव कळत नाही, आणि गुरुवाचून अनुभव कसा कळेल. तप केल्यावाचून दैवत नाही, दिल्यावाचून काही हाती येत नाही, आणि गुज नसेल तर हित कोण सांगेल. ज्ञानदेव सांगतात, साधूंची संगती हा तरून जाण्याचा मार्ग आहे.

- संत ज्ञानेश्वर