पर्वताप्रमाणें पातक करणें ।
वज्रलेप होणें अभक्तांसी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त ।
हरीसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ ।
त्यां कैंचा दयाळ पावे हरी ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।
सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
पर्वताएवढे पाप केले तरी अभक्ताजवळ ते वज्रलेपाप्रमाणे चिकटते. ज्याच्या ठायी भक्ती नाही तो पतित अभक्त, आणि हरीला न भजणारा दैवहत आहे. अनंत वाचाळ बरळत बसतात. दयाळ हरि त्यांच्यापर्यंत कसा येईल. ज्ञानदेव म्हणतात, आत्मा हे खरे निधान आहे. तो एक आणि पूर्ण, प्रत्येकाच्या ठायी नांदतो.
- संत ज्ञानेश्वर