अभंग

विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान

ज्ञानदेवांचा हरिपाठ ९.

विष्णुविणें जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचे ॥१॥
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा ।
रामकृष्णीं पैठा कैसा होय ॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
त्या कैंचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचें ॥४॥

विष्णूवाचून जप व्यर्थ आहे, आणि ज्याच्या मनात रामकृष्ण नाही त्याचे ज्ञानही व्यर्थ आहे. अद्वयाची वाट न कळणारा रामकृष्णात कसा शिरेल. गुरुवाचून द्वैताची झाडणी होत नाही, आणि नामाचे कीर्तन घडत नाही. ज्ञानदेव म्हणतात, सगुण हे ध्यान आहे, आणि नामपाठ हा प्रपंचातील मौन आहे.

- संत ज्ञानेश्वर