जें का रंजलें गांजलें ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥
तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥
मृदु सबाह्य नवनीत ।
तैसें सज्जनाचें चित्त ॥२॥
ज्यासि आपंगिता नाहीं ।
त्यासि घरी जो हृदयीं ॥३॥
दया करणें जें पुत्रासी ।
ते चि दासा आणि दासी ॥४॥
तुका म्हणे सांगूं किती ।
तो चि भगवंताची मूर्ती ॥५॥
जो रंजलेल्याला आणि गांजलेल्याला आपले मानतो, तो साधू ओळखावा, आणि देव तेथेच जाणावा. त्याचे चित्त बाहेरून आणि आतून नवनीतासारखे मऊ असते. ज्याला आपणपण नाही, त्याला जो हृदयात घेतो, आणि मुलावर जशी दया तशी दासादासीवर करतो, तो भगवंताची मूर्ती आहे, असे तुका म्हणतो.
- संत तुकाराम