अभंग

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल

संत एकनाथांचा अभंग.

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्ति भीमा उदक तें वाहे ।
बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान-ध्यान-पूजा विवेक आनंद ।
हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनीं-वनीं ।
एका जनार्दनी वारी करी ॥६॥

एकनाथ पंढरी देहातच पाहतात. काया ही पंढरी आहे, आणि आत्मा हा विठ्ठल आहे. भाव आणि भक्ती ही भीमा वाहते, आणि त्या तीरी पांडुरंग शोभतो. दया, क्षमा आणि शांति हा वाळुवंट आहे. तेथे वैष्णवांचा थाट मिळाला आहे. ज्ञान, ध्यान, पूजा आणि विवेक हा वेणुनाद आहे. दहा इंद्रियांचा मेळ गोपाळकाळ झाला आहे. एकनाथ म्हणतात, पंढरी देहात, जनांत आणि वनात दिसली, आणि वारी तेथेच होते.

- संत एकनाथ