अभंग

खेळ मांडियेला वाळवंटीं घाई

संत तुकारामांचा अभंग.

खेळ मांडियेला वाळवंटीं घाई ।
नाचती वैष्णव भाई रे ।
क्रोध अभिमान केला पावटणी ।
एक एका लागतील पायीं रे ॥१॥
नाचती आनंदकल्लोळीं ।
पवित्र गाणें नामावळी ।
कळिकाळावरि घातलीसे कास ।
एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा ।
हार मिरवती गळां ।
टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ॥२॥
लुब्धलीं नादीं लागली समाधी ।
मूढ जन नर नारी लोकां ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव ।
एकचि सद्धिसाधकां रे ॥३॥
वर्णाभिमान विसरली याति ।
एकएकां लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें ।
पाषाणा पाझर सुटती रे ॥४॥
होतो जयजयकार गर्जत अंबर ।
मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट ।
उतरावया भवसागर रे ॥५॥

वाळवंटात घाईने खेळ मांडला आहे. वैष्णव भाई नाचतात, आणि क्रोध व अभिमान पावटणीला गेले आहेत. नामावळीच्या गाण्यात आनंदकल्लोळ आहे. कळिकाळावर कास घातली आहे. गोपीचंदन, तुळशीच्या माळा, टाळ आणि मृदंग आहेत, पुष्पवृष्टी आहे. नादाने समाधी लागली आहे. मूढ आणि पंडित, ज्ञानी आणि योगी एकाच साधनेत आले आहेत. वर्ण आणि जात विसरली आहे. एकमेकांना लोटांगण घालतात, चित्त नवनीतासारखे निर्मळ झाले आहे, पाषाणालाही पाझर फुटला आहे. जयजयकार गर्जतो. तुका म्हणतो, भवसागर उतरण्याची पायवाट सोपी केली आहे.

- संत तुकाराम