लाहानपण दे गा देवा ।
मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर ।
तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥
ज्याचे अंगीं मोठेपण ।
तया यातना कठीण ॥२॥
तुका ह्मणे जाण ।
व्हावें लाहनाहुनि लाहन ॥३॥
देवाकडे लाहानपण मागितले आहे. मुंगीला साखरेचा रवा मिळतो. ऐरावत रत्न थोर आहे, त्याला अंकुशाचा मार बसतो. ज्याच्या अंगी मोठेपण आहे, त्याला यातना कठीण आहेत. तुका म्हणतो, लाहानाहून लाहान व्हावे.
- संत तुकाराम