अभंग

ताटी उघडा ज्ञानेश्वरा

संत मुक्ताबाईंचा अभंग.

योगी पावन मनाचा ।
साहे अपराध जनांचा ॥
विश्व रागें झालें वन्ही ।
संतीं सुखें व्हावें पाणी ॥
शब्दशास्त्रें झालें क्लेश ।
संतीं मानावा उपदेश ॥
विश्वपट ब्रह्मदोरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥१॥

सुखसागरीं वास झाला ।
उंचनीच काय त्याला ॥
अहो आपण जैसें व्हावें ।
देवें तैसेंचि करावें ॥
ऐसा नटनाट्य खेळ ।
स्थिर नाहीं एक वेळ ॥
एकापासोनी अनेक झालें ।
त्यासी पाहिजे सांभाळिलें ॥
शून्य साक्षित्वें समजावें ।
वेद ओंकाराच्या नावें ॥
एकें उंचपण केलें ।
एक अभिमानें गेलें ॥
इतुकें टाकुनी शांति धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥२॥

वरी भगवा झाला नामें ।
अंतरीं वश्य केला कामें ॥
त्याला म्हणों नये साधू ।
जगीं विटंबना बाधू ॥
आपआपणा शोधुनी घ्यावें ।
विवेक नांदे त्याच्यासवें ॥
आशा दंभ अवघे आवरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥३॥

संत तोचि जाणा जगीं ।
दया क्षमा ज्याचे अंगीं ॥
लोभ अहंता नये मना ।
जगीं विरक्त तोचि जाणा ॥
इहपरलोकीं सुखी ।
शुद्ध ज्ञान ज्याचे मुखीं ॥
मिथ्या कल्पना मागें सारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥

एक आपण साधू झाले ।
येर कोण वायां गेले ॥
उठे विकार ब्रह्मीं मूळ ।
अवघें मायेचें गाबाळ ॥
माया नुरे जेव्हां ।
विश्वब्रह्म होईल तेव्हां ॥
ऐसा उमज आदि-अंतीं ।
मग सुखी व्हावें संतीं ॥
चिंता क्रोध मागें सारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥

ब्रह्म जैसें तैसापरी ।
आम्हां वडील भूतें सारी ॥
हात आपुला आपणा लागे ।
त्याचा करूं नये खेद ॥
जीभ दातांनी चाविली ।
कोणे बत्तिशी पाडिली ॥
थोर दुखावलें मन ।
पुढें उदंड शहाणे ॥
चणे खावे लोखंडाचे ।
मग ब्रह्मपदीं नाचे ॥
मन मारूनी उन्मन करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥६॥

सुखसागर आपण व्हावें ।
जग बोधें निववावें ॥
बोधा करूं नये अंतर ।
साधू नाहीं आपपर ॥
जीव जिवासी पैं द्यावा ।
मग करूं नये हेवा ॥
तरणोपाय चित्तीं धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥

अहो क्रोधें यावें कोठें ।
अवघें आपण निघोटें ॥
ऐसें कळलें उत्तम ।
जन तेचि जनार्दन ॥
ब्रीद बांधिलें चरणीं ।
न ये दाविता करणी ॥
वेळ क्रोधाचा उगवला ।
अवघा योग फोल झाला ॥
ऐसी थोर दृष्टी धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥८॥

सांडीं कल्पना उपाधी ।
तीच साधूला समाधी ॥
वाद घालावा कवणाला ।
अवघा द्वैताचा हो घाला ॥
पुढें उमजेना काय ।
उडत्याचे खालीं पाय ॥
एक मन चेष्टा करी ।
भूतें बापुडीं शेजारीं ॥
अवघी ईश्वराची करणी ।
काय तेथें केलें कोणी ॥
पुनः शुद्ध मार्ग धरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥९॥

गिरिगव्हारें कशासाठीं ।
रागें पुरविली पाठीं ॥
ऐसा नसावा संन्यासी ।
परमार्थाचा जो का द्वेषी ॥
घर बांधिलें डोंगरीं ।
विषया हिंडे दारोदारीं ॥
काय केला योगधर्म ।
नाहीं अंतरीं निष्काम ॥
गंगाजळ हृदय करा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥१०॥

शुद्ध ज्याचा भाव झाला ।
दुरी नाहीं देव त्याला ॥
अवघीं साधनें हातवटी ।
मोल मिळत नाहीं हाटीं ॥
अहो आपण तैसें व्हावें ।
अवघें अनुमानोनी घ्यावें ॥
ऐसें केलें सद्गुरुनाथें ।
बाप रखुमादेवीकांतें ॥
तेथें कोणी शिकवावें ।
सार साधुनिया घ्यावें ॥
लडिवाळ मुक्ताबाई ।
जीव मुद्दल ठायींचे ठायीं ॥
तुम्ही तरून विश्व तारा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥११॥

ताटी बंद करून बसलेल्या ज्ञानेश्वराला मुक्ताबाई ताटी उघड म्हणते. योग्याचे मन पावन असावे, जगाचे अपराध साहावे. राग आगीसारखा झाला तर संताने पाणी व्हावे. संत तो, ज्याच्या अंगी दया आणि क्षमा आहे. आपण साधू झालो आणि इतर वाया गेले, हा अभिमान सोडावा. क्रोध आला की योग फोल होतो. शुद्ध भाव झाला की देव दूर नाही. शेवटी ती म्हणते, तुम्ही तरून विश्व तारा, आणि ताटी उघडा.

- संत मुक्ताबाई