बाळ सगुण गुणाचें तान्हें गे ।
बाळ दिसतें गोजिरवाणें गे ।
काय सांगतां गार्हाणें गे ।
गोकुळींच्या नारी ॥१॥
श्रीरंग माझा वेडा गे ।
याला नाहीं दुसरा जोडा गे ।
तुम्ही याची संगत सोडा गे ।
गोकुळींच्या नारी ॥२॥
पांच वर्षाचें माम्हें बाळ गे ।
अंगणीं माझ्या खेळे गे ।
कां लटकाच घेतां आळ गे ।
गोकुळीच्या नारी ॥३॥
सांवळागे चिमणा माझा ।
गवळणींत खेळे राजा ।
तुम्ही मोठया ढालगजा गे ।
गोकुळींच्या नारी ॥४॥
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा ।
आळ घेतां या गोपाळा गे ।
तुम्ही ठाईंच्या वोढाळागे ।
गोकुळींच्या नारी ॥५॥
तुम्हीं लपवुनी याची गोटी गे ।
लागतां गे याचे पाठीं गे ।
ही एकढीच रीत खोटीगे ।
गोकुळींच्या नारी ॥६॥
तुम्ही लपवून याचा भवरा गे ।
धरूं पाहतां सारंगधरा ।
तुम्ही बारा घरच्या बारागे ।
गोकुळींच्या नारी ॥७॥
हा ब्रम्हाविधीचा जनीता गे ।
तुम्हीं याला धरूं पाहतांगे ।
हा कैसा येईल हातां गे ।
गोकुळींच्या नारी ॥८॥
नामा म्हणे यशोदेसी गे ।
हा तुझा ह्रषिकेशी गे ।
किती छळितो आम्हासी गे ।
गोकुळींच्या नारी ॥९॥
यशोदा गोकुळीच्या नारींना सांगते, माझे बाळ सगुणांचे तान्हे आहे, गोजिरवाणे दिसते. श्रीरंग वेडा आहे, त्याला दुसरा जोड नाही, त्याची संगत सोडा. पाच वर्षांचे माम्हे बाळ अंगणात खेळते, लटका आळ का घेता. सांवळा चिमणा गवळणीत खेळतो, आणि तुम्ही ढालगजा आहात. लोण्याचा गोळा खाऊन गोपाळावर आळ घेता. गोटी लपवून पाठी लागता, ही रीत खोटी आहे. भवरा लपवून सारंगधराला धरू पाहता. हा ब्रह्मविधीचा जनिता आहे, हातात येईल कसा. नामा यशोदेला म्हणतो, हा तुझा हृषिकेश आहे, आणि गोकुळीच्या नारींना किती छळतो.
- संत नामदेव