गवळण

गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा

नामदेवांची गवळण २.

गेलिया वृंदावना तेथें देखिला कान्हा ।
संवगडिया माजी उभा ध्यान लागलें मना ॥१॥
हरिनाम गोड झालें काय सांगों गे माय ।
गोपाळ वाहती पावे मन कोठें न राहे ॥२॥
त्याचें मुख साजिरें वो कुंडलें चित्त चोरें ।
सांडुनी अमृत धनी लुब्धलीं चकोरें ॥३॥
सांडुनी ध्रुवमंडळ आली नक्षत्रमाळा ।
कौस्तुभा तळवटीं वैजयंती शोभे गळां ॥४॥
सांडुनी मेघराजु कटिसूत्नीं तळपे विजू ।
भुलला चतुराननू तया नव्हे उमजू ॥५॥
सांडुनी लक्ष्मी निज गोपाळासी बोले गुज ।
अचोज हा चोजवेना ब्रम्हांदिकां सहज ॥६॥
वांजट धीट मोठी ऐसी कवण असे खिळू ।
भेदली हरिचरणीं पायीं मुरडीव वांकी सोज्वळू ॥७॥
त्याचें पायींची नेपुरें वाजती वो गंभीरें ।
लुब्धलीया पक्षयाती धेनु पाचारी स्वरें ॥८॥
आणिक एक नवल कैसें स्वर्गीं देव झाले पिसे ।
ब्रम्हादिक उच्छिष्ठालागीं देखा जळीं झाले मासें ॥९॥
आणिक एक नवल परी करीं घेऊनि शिदोरी ।
सवंगडया वांटितसे नामया स्वामी मुरारी ॥१०॥

वृंदावनात कान्हा दिसला, सवंगड्यांच्या माजी उभा, मनाला ध्यान लागले. हरिनाम गोड झाले. गोपाळ पाऊल वाहतात, मन कुठेच राहत नाही. मुख साजिरे आहे, कुंडले चित्त चोरतात. अमृत सोडून चकोर लुब्धले. ध्रुवमंडळ सोडून नक्षत्रमाळा आली, गळ्यात वैजयंती शोभते. मेघराज सोडून कटीसूत्रात वीज तळपते, चतुरानन भुलला. लक्ष्मी निज सोडून गोपाळाला गुज बोलते. पायींची नेपुरे गंभीर वाजतात, धेनु पाचारतात. स्वर्गी देव पिसे झाले. आणखी नवल, हाती शिदोरी घेऊन नामयाचा स्वामी मुरारी सवंगड्यांना वाटतो.

- संत नामदेव