गवळण

लांचावलें ब्रह्म भक्तीचेनि सुखें

नामदेवांची गवळण २१.

लांचावलें ब्रह्म भक्तीचेनि सुखें ।
गोकुळीं गोपाळवेशें गाई राखे ॥१॥
त्रिभुवनीं न समाये ब्रम्हादिकां लक्षा नये ।
तो दास्यत्व करिताह गौळीयांचें ॥२॥
नवलाव गे माये देखियला साजिरा ।
परब्रम्हा जालेंसे पिसें गे माये ॥४॥
निगमा निर्धारितां अमरा दर्शनाची आस ।
मुनिजनां ध्यानीं आभास तोही नाहीं ॥५॥
तें हें नित्य पूर्ण लाडेंकोडें खेळविती गौळणी ।
मा मुख चुंबन देउनी गौळणी ह्रदयीं आलिंगिती ॥६॥
क्षीरसागरींचें सुख सांडुनी अशेष ।
रुक्मिणी सेजेचे विलास तेहि नावडती ॥७॥
तें हें गोधना गोठणीं लोळे शुद्ध चैतन्य सांवळें ।
तें सुखही न कळे साचें चतुरानना ॥८॥
भक्ती प्रेम भाव देखे आहे जेथें ।
हरि वोरसला जाये तेथें कैचें नैश्वरत्व ॥९॥
न विचारी जातीकूळ शुची अथवा चांडाळ ।
ह्रदय देखुनि निर्मळ प्रीति धरी तेथें ॥१०॥
ऐसें त्रिभुवन सुखाचें सार कीं अनाथाचें माहेर ।
अव्यक्त परि साकार जालें असे तें ॥११॥
भक्ताचेनि वियोगें श्रमलें म्हणोनि गोकुळासी आलें ।
तेणें प्रेम सुख दिधलें नामयासी ॥१२॥

भक्तीच्या सुखाने ब्रह्म लांचावले, गोकुळी गोपाळवेषाने गाई राखते. त्रिभुवनात न सामावणारा, ब्रह्मादिकांच्या लक्ष्यात न येणारा, तो गवळ्यांचे दास्यत्व करतो. माय, नवल साजिरा दिसला, परब्रह्म पिसें झाले. निगम निर्धारितात अमरांना दर्शनाची आस आहे, मुनिजनांच्या ध्यानात आभासही नाही. गौळणी लाडेकोड खेळवितात, मुख चुंबन देतात, आलिंगन देतात. क्षीरसागर आणि रुक्मिणीचे विलासही न आवडतात. गोठणीत शुद्ध चैतन्य सांवळे लोळते. जेथे भक्तीप्रेम आहे तेथे हरि वोरसला जातो. जातीकूळ न पाहता निर्मळ हृदयात प्रीति धरतो. हे त्रिभुवनसुखाचे सार आणि अनाथांचे माहेर आहे. भक्ताच्या वियोगाने श्रमल्याने गोकुळाला आले, आणि नामयाला प्रेमसुख दिले.

- संत नामदेव