मस्तकीं ठेवुनियां डेरा ।
करूं निघाली विकरा ।
साच करितसे पुकारा ।
म्हणे गोविंद घ्या वो ॥१॥
बोल बोलती आबळा ।
तंव त्या हांसती सकळा ।
मुखीं पडियेला चाळा ।
या गोपाळाचा ॥२॥
दहीं म्हणावासे ठेले ।
वाचे गोविंद पैं आलें ।
चित्त चैतन्य रंगलें ।
कान्हु चरणीं बाई वो ॥३॥
उन्नतीये बोलती नेती ।
चालता गज गती ।
कान्हु वांचुनी चित्तीं ।
आणीक नेणें बाई वो ॥४॥
जाऊनियां बळीच्या द्वारां ।
त्रिपांड केली वसुंधरा ।
कैसा सावाला तुमच्या डेरा ।
दाखवी बाई वो ॥५॥
वृद्ध गौळणी पाचारिती ।
आणी वो अरुता श्रीपती ।
कोठें गोविंदु विकिती ।
नाहीं देखियला बाई वो ॥६॥
श्रीरंगी रंगला जीवु ।
म्हणे घ्यावो हा माधवु ।
बरवा रमापती गौरवु ।
साच आणियला कैसा ॥७॥
बाळा भरूनियां बाळा ।
देखे श्रीरंगु साव्ळा ।
बेधीं वेधल्या सकळां ।
गोपी गोविंदासवें ॥८॥
गोविंद म्हणा वाचे ।
गोविंद स्मरण करा साचे ।
दोष हरती जन्माचे ।
छंद लागला तयाचा ॥९॥
नामया स्वामी हो मुरारी ।
मज पाहतां अभ्यंतरी ।
शेकी वापिलें निर्धारीं ।
मनुष्य्पण ॥१०॥
मस्तकी डेरा ठेवून विकरायला निघाली, गोविंद घ्या वो अशी पुकार करते. बोलता बोलता आबळा हसतात, मुखी गोपाळाचा चाळा पडला. दही म्हणावयाचे ठेले, वाचेला गोविंद आला, चित्त कान्हुचरणी रंगले. उन्नतीने बोलते, गजगतीने चालते, चित्तात कान्हुवाचून दुसरे नेणे. बळीच्या द्वारा त्रिपांड केली, डेऱ्यात कसा सावाला दाखव. वृद्ध गौळणी पाचारतात, अरुत श्रीपती आण, गोविंद विकतो कोठे. जीव श्रीरंगी रंगला, हा माधव घ्या वो. बाळाने श्रीरंग सांवळा पाहिला, गोपी गोविंदाबरोबर वेधल्या. गोविंद म्हणा, स्मरण करा, जन्माचे दोष हरतात. नामयाचा स्वामी मुरारी, पाहता अभ्यंतरी मनुष्यपण शेकी व्यापिले.
- संत नामदेव