प्रात:काळीं प्रहार रात्रीं गोणी बाळा ।
घुसळण मांडियेलें घरोघरीं सकळां ।
नित्यानंदें परमानंदें गाती गोपाळा ।
सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा ॥१॥
घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती ।
आनंदल्या गौळणी छंदें छंदें डोलती ॥ध्रु०॥
एक म्हणती साजणी तुम्हीं लपवागे लोणी ।
नकळे हो बाई कृष्णाची करणी ।
कोणीकडून हा गे येईल सखये चक्रपाणी ।
खास खांदूनि तुम्हीं आतां लपवा दुधाणी ॥२॥
बोलतां चालतां इतुक्यामध्यें हरी आला ।
कवणेंहीं नाहीं देव द्दष्टि देखिला ।
सूक्ष्म रूप धरूनि डेर्यामध्यें प्रवेशला ।
वरच्यावरी देव लोणी खाऊनियां गेला ॥३॥
उन्हवणी शिळवणी घालिती परतें लोणी येईना ।
काय झालें ढोणे सासूबाई कळेना ॥४॥
हा हा गे बायांनो तुमचे जाणतें चाळे ।
यश्वदेच्या मुला नेऊनि देतसां गोळे ।
उगोंचि मग पाहतां आतां फिरगे निराळे ।
मारी ठोसरे दोन्ही गाल्होरे घेतले ॥५॥
डेर्यामधून मार माझा जगजीवन पाहे ।
नामा म्हणे धन्य धन्य वर्णूं मी काये ॥६॥
पहाटे आणि रात्री घरोघरी घुसळण मांडले आहे. गौळणी नित्यानंदाने गोपाळ गातात. डेरे घुमघुम करतात, गौळणी छंदाने डोलतात. एक सखी म्हणते, लोणी लपवा, कृष्णाची करणी कळत नाही. बोलता बोलता हरी आला, कोणाला दिसला नाही. सूक्ष्म रूपाने डेऱ्यात शिरला आणि वरच्यावरी लोणी खाऊन गेला. उन्हवणी शिळवणी घातली तरी लोणी येईना. बायांनो, तुमचे चाळे कळले, यशोदेच्या मुलाला गोळे नेऊन देता. ठोसरे मारले, दोन्ही गाल होरपळले. डेऱ्यातून जगजीवन पाहतो. नामा म्हणतो, धन्य धन्य, मी काय वर्णन करू.
- संत नामदेव