रात्री काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥
बंथ काळी बिलवार काळी ।
गळां मोतीं एकावळी काळी वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥
एकली पाणीया नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ती सांवळी वो माय ॥४॥
विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥
रात्र काळी आहे, घागर काळी आहे, यमुनेचे पाणीही काळे आहे. बंध काळा आहे, बिलवार काळी आहे, गळ्यातली मोत्यांची एकावळी काळी आहे. मी काळी, कांचोळी काळी, कांस कासलेली तीही काळी. सखी एकटी पाण्याला जात नाही. सोबत सांवळी मूर्ती पाठव. विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी आहे, आणि कृष्णमूर्ती फार काळी आहे.
- संत नामदेव