तळवे तळहात टेंकीत ।
डाव्या गुडघ्यानें रांगत ।
रंगणी रंगनाथ ।
तो म्यां देखिला सये ॥१॥
गवळण जसवंती पैसांगे ।
आलेवर कृष्णाचेनि मागें ।
येणें येणें वो श्रीरंगें ।
नवनीत माझें भक्षिलें ॥२॥
एक्या हातीं लोण्याचा कवळु ।
मुख माखिलें अळुमाळु ।
चुंबन देतां येतो परिमळु ।
नवनीताचा ये सये ॥३॥
येणें माझें कवाड उघडिलें ।
येणें शिंकें हो तोडिलें ।
दह्यादुधातें भक्षिलें ।
उलंडिलें ताकातें ॥४॥
ऐसें जरी मी जाणतें ।
यमुनापाणिया नव जातें ।
धरूनि खांबासी बांधितें ।
शिक्षा लावितें गोविंदा ॥५॥
ऐसा पुराण प्रसिद्ध चोर ।
केशव नाम्याचा दातार ।
पंढरपुरीं उभा विटेवर ।
भक्त पुंडलिकासाठीं ॥६॥
गवळण जसवंती सखीला सांगते, तळवे आणि तळहात टेकून रांगणारा रंगनाथ मी पाहिला. तो माझ्या मागे आला आणि नवनीत खाल्ले. एका हाती लोण्याचा कवळा, मुख अळुमाळु माखलेले. त्याने कवाड उघडले, शिंक्या तोडल्या, दहीदूध खाल्ले, ताक उलंडले. हे कळले असते तर यमुनेच्या पाण्याला गेले नसते, खांबाला बांधून गोविंदाला शिक्षा केली असती. असा हा पुराणप्रसिद्ध चोर आहे. नामदेव म्हणतो, केशव माझा दातार आहे, आणि तो पंढरपुरी विटेवर पुंडलिकासाठी उभा आहे.
- संत नामदेव