यशोदे घराकडे चाल मला जेवूं घाल ॥धु०॥
साध्या गव्हांची पोळी लाटीं ।
मला पुरण पोळी करून दे मोठी ।
नाहीं अडवीत गुळासाठीं ।
मला जेवूं घाल ॥१॥
तूप लावून भाकर करीं ।
वांगें भाजून भरीत करीं ।
वर कांद्याची कोशिंबिरी ।
मला जेवूं घाल ॥२॥
आईग खडे साखरेचे खडे ।
लवकर मला करून दे वडे ।
बाळ स्फुंदस्फुंदोनी रडे ।
मला जेवूं घाल ॥३॥
आई लहानच घे गे उंडा ।
लवकर भाजुन दे मांडा ।
लांब गेल्या गाईच्या झुंडा ।
मला जेवूं घाल ॥४॥
आई मी खाईन शिळा घांटा ।
दह्याचा करून दे मठ्ठा ।
नाहीं माझ्या अंगीं ताठा ।
मला जेवूं घाल ॥५॥
भाकर बरीच गोड झाली ।
भक्षुनी भूक हारपली ।
यशोदेनें कृपा केली ।
मला जेवूं घाल ॥६॥
आई मी तुझा एकुलता एक ।
गाई राखितों नउ लाख ।
गाई राखून झिजलीं नख ।
मला जेवूं घाल ॥७॥
नामा विनवी केशवासी ।
गाई राखितो वनासी ।
जाऊन सांगा यशोदेशी ।
मला जेवूं घाल ॥८॥
कृष्ण यशोदेला घराकडे बोलावतो आणि जेवण मागतो. साध्या गव्हाची पोळी, मोठी पुरणपोळी, तूप लावलेली भाकर, वांगी भरीत, कांद्याची कोशिंबीर, साखरेचे खडे, वडे, उंडा, मांडा, शिळा घाटा आणि दह्याचा मठ्ठा, अशी मागणी आहे. बाळ रडत आहे, गाईंच्या झुंडी लांब गेल्या आहेत. भाकर गोड झाली, भूक गेली, यशोदेने कृपा केली. आई, मी तुझा एकुलता आहे, नऊ लाख गाई राखतो. नामा केशवाशी विनवितो. यशोदेशी सांगा, मला जेवू घाल.
- संत नामदेव