येत येत उभा राजबिदीं ।
सर्वें चाले गोपाळांची मांदी ।
नारी पाहती उभया बिदीं ।
एकीच्या धरूनि बाहुवा खांदीं ॥१॥
हरिहरनंदना साद्दश्य लोचना ।
डोळ्यां वेगळा न बा जासी कान्हा ।
अरे कान्हा मनमोहना ।
गोपी भुलल्या तुझिया गुणा ॥ध्रु०॥
चतुर्वेद नागवी भाट सांगातें ।
उभया वर्णितां रामकृष्णातें ।
श्रुति स्मृति विद्यावंतें ।
जय जय म्हणती कृपानिधितें ॥२॥
येत येत उभा रहात ।
सुदाम्याच्या खांद्यावरी हात ।
समद्दष्टी गोपिका न्याहाळीत ।
चैतन्य चोरोनि आनंदें डुल्लत ॥३॥
ऐसा कृष्ण सौभाग्यसुंदर ।
लावण्य गुण रत्नाकर ।
विष्णुदास नामयाचा दातार ।
भक्ति भावें वोळंगा सारंगधर ॥४॥
राजबिदीवर उभा राहून गोपाळांची मांदी चालते. नारी बाहू धरून पाहतात. कान्हा, गोपी तुझ्या गुणांनी भुलल्या आहेत. चतुर्वेद आणि भाट रामकृष्णाला वर्णितात, श्रुतिस्मृति जय जय म्हणतात. सुदामाच्या खांद्यावर हात ठेवून उभा राहतो, गोपिका समदृष्टीने न्याहाळतात. असा हा सौभाग्यसुंदर कृष्ण आहे. विष्णुदास नामयाचा दातार, भक्तिभावाने वोळंगा.
- संत नामदेव