सोमवाराचे दिवशीं निघाले परशरामभाऊ ॥ अकीवाटावर हल्ला नेमिली सैन चला जाऊं ॥धृ॥
मिळूनियां उमराव अवघ्यांनी मनसोबा केला ॥ जासूदाच्या जोडया पत्र पाठविलें मिरलेला ॥ सवाई माधवराव नाना फडणीस बोलला ॥ मिळवा सारी शाही आज्ञा केली भाऊला ॥ राजासंगे खरा दावा लावला ॥ मुलखाची वसाडी दिवा लागेनासा जाहला ॥ महाराजांची दया आम्हांवर परसन्न शाहू ॥१॥
भोवानराव भगवंत दोघे बंधू अष्टप्रधान ॥ हरीपंत फडक्याचें त्याजवरी लिहिलें सैन ॥ बावडयाची बंदोबस्ती खबर ऐकून ॥ करवीराला वेढा घातला माहादजी शिंद्याने ॥ खासा सेनापती सखाराम पाठविला त्याने ॥ पेंढार्याच्या धुमा अवघे लोटलें सैन । कुलक्षेत्राची जागा अवघे देव चला उठवूं ॥२॥
सवाई माधवराव जन्मले खानदान । गोकाकच्या नदीवर जाऊं दे सैन । मनोळीची बारी लुटली सडया रावताने । सिरोट्टीला वेढा हादर्या आला राव चालून ॥ सामानगडची खंडणी घेतली रगाडले सैन ॥ आदी घेऊन आकीवाट मग काय शिरोळास जाऊं ॥३॥
अष्टकारकून अष्टउमराव उभा देवडीला ॥ चिटणीस फडणीस पोतनीस विचार त्यांनी केला ॥ बारा हजारा घोडा त्यामधि खासा निवडीला ॥ जरिपटका चौघडा नौबत वाजे बिन्नीला ॥ गारद्याचा बाजा भार रोहिल्याचा चालला ॥ सिदरायाचा माळ तयाने जागा नेमिला ॥ करुनिया मतलब मोचें दिले राव गांवाला ॥ सिदरायाने कौल दिल्ला आहे प्रसन्न तुजला । आज पंधरावे रोजीं किल्ला येईल हाताला । नका करू अनमान किल्ला घटकेमधिं घेऊ ॥४॥
आकीवाटाला वेढा गांव लढविला शरतीन । तेव्हां येल्यापा जेठयापा किल्यामधि बंधू दोघेजण । लिहूनियां कागदपत्र पाठविले भाऊन । बेगी सोडा किल्ला तुम्हांला देतो जीवदान । ह्मणे आपाजीपंत सल्ला करावा जलदीन । विचार नाही बरा जी अवघें सरलें सामान । सुभेदाराची कुमक कोठें दिसत नाहीं आझून । मायापा बाळापा त्यानी आणले बलावून ॥ म्हणे बच्याजीपंत तुम्ही भीम अर्जुन ॥ महाराजांचें अन्न खाल्लें भोंदून ॥ इतकें वचन आईकतां धांवले समशेर उपसून ॥ आम्ही यातीचे लव्हार दोघे झुजुं शरतीन ॥ वकत पडल्यावर अवघे मरून खरे होऊं ॥ पर किल्ला ना देऊं ॥५॥
आईतवाराचे दिशीं ताकीद होती सैनेला ॥ सोमवाराचे दिवशीं तयानें हल्ला नेमीला ॥ पहिले प्रहररात्रा हल्ला निनदां मोडला ॥ बरकंदासाचे बार झडती गणता नाही त्याला ॥ दारू आणि गोळ्यांने सूर्या झाकुळला ॥ भांडयाच्या माराला कोण वळखिना कवणाला ॥ दोन कोतवाल हत्ती नीट चालविला वेशीला ॥ विक्रमाची उज्जनी तिते रणखांब गाडला ॥ तीनशे साठ मुडदे तयानें कागद वाचिला ॥ आम्ही धाक माहाराठी फौज हिचा दर्प सकळाला ॥ श्रीमंत महाराज पेशवा याला तोंड कसें दावूं ॥६॥
इतके वचन ऐकतां भाऊला क्रोध फार येऊन ॥ रघुनाथ दादा जवळ घेतले बलावून । खेडयाखेडयासी ताकीद शिडया येवूं दे जलदीनं । खोरें आणि कुद्ळी बिगारी काढा सामान । लव्हार आणि सुतार अवघे मिळविले सैन । असे अठराहि कारखाने गोळ्या झडती खणाखण । कामाठे बेलदार लाविले मोर्चा कारण । गंगाधर फडणीस गेला बिन्नी धरून । त्यासी लागल्या जखमा ठार पडला दिवाण । तेव्हा येल्यापा जेठयापा किल्यांत बंधू दोघेजण । शिंग आणि हलग्याचा बाजा होता कडाक्यान । चवरी अबदागिरी रुमाल काय उडती मौजेन । टकमका पाहती शाही झळकती रुप्याचेंम्यान ॥ भला होता सरदार त्यासी चला कीहो पाहूं ॥७॥
इतकें वचन ऐकितां भाऊला ईर चढली फार ॥ चंदी चंदावर दिल्ली ओरंगाबाद शाहर । उदंड घेतले किल्ले काय या खेडयाचा पडीबार ॥ आकीवाटच्यासाठी बुडाली कैकांची घर ॥ मारून चकाचूर गांव करूं बरोबर ॥ चहूं वेशीला च्यार शिडया लावा लौकर ॥ आंतल्यांनी मारा केला आगीचा फार ॥ वहिल्या वेशीनें हल्ला चढली हर बोला सार ॥ खायले वेशीने लव्हार दोघे जाहले तयार ॥ ढाल पट्टा चढवून आला हणमंता ह्योर ॥ बलभीमाचे नांव घेतां लगी आहे समशेर ॥ समशेरीने लोक कापले अवघे लहान थोर ॥ अशुद्धाचे पाट चालिले वेशी बाहेर ॥ कौरव पांडव झुंजले जाहला संव्हार ॥ जाळी मधि व्याघ्र कोंढून केला की हो जेर ॥ दोघे लव्हार ठार पडले हणमंता ह्योर ॥ भले होते लव्हार त्यासी चला कीं हो पाहूं ॥८॥
आकीवाट घेऊन भाऊ यशवंत झाला ॥ चौघडा वाजवीत शहर पुण्याशी गेला ॥ सवाई माधवराव नाना फडणीस बोलला ॥ महाराजाचा कळस तुम्ही कैसा पाडिला ॥ नऊलाखाचा खर्च जाहला सांगी पेशव्याला ॥ शिरोळा मधि ठाणें फौजा गेल्या देशाला । करूनिया वस्त्रें भाऊला परगणा दिला । येथून जाहला पोवाडा आईका सांगेन तुम्हाला । धीनगीरी गोसावी शिव प्रसन्न त्याला ॥ म्हणे मानशिंग भोवाना रजपूत गातो सभेला ॥ किती गासी नागीशा आतां किंमत तुझी पाहूं ॥ आकीवाटावर हल्ला नेमिली सैन चला जाऊं ॥९॥
या पोवाड्यात सांगितले आहे. सोमवाराचे दिवशीं निघाले परशरामभाऊ अकीवाटावर हल्ला नेमिली सैन चला जाऊं मिळूनियां उमराव अवघ्यांनी मनसोबा केला जासूदाच्या डया पत्र पाठविलें मिरलेला सवाई माधवराव नाना फडणीस बोलला मिळवा सारी शाही आज्ञा केली भाऊला राजासंगे खरा दावा लावला मुलखाची वसाडी दिवा लागेनासा जाहला महाराजांची दया आम्हांवर परसन्न शाहू. पुढे भोवानराव भगवंत दोघे बंधू अष्टप्रधान हरीपंत फडक्याचें त्याजवरी लिहिलें सैन बावडयाची बंदोबस्ती खबर ऐकून करवीराल.
- पारंपरिक