पोवाडा

सर केला टिपू सुलतान फिरंग

पारंपरिक मराठी पोवाडा.

सर केला टिपू सुलतान फिरंगी बाण गवसली खाण सोन्याची ॥ सोडीना फिरंगी लालुज पटणाची ॥धृ.॥
थोर होऊन शान अभिमान होउनी रावण होऊनी पाच्छाई द्वाही फिरविली परगण्यासी ॥ कैदेंत घातले कुंभार राजासी ॥ महाराठ लोक ब्राह्मण नेई धरून कापी चोमण मुसलमान केले राव तयासी ॥ बारा हजार चेला जमला पंक्तीसी ॥ चौमुलुखी पडली धासत नाव कोण घेतो थोर इभ्रत तोफेची कानडे लोक फलटान केले त्यासी ॥ त्याने दावा लाविला फिरंग्यासी ॥चाल॥ भौवताचा वैरी टिकल फार दिवशीं ॥ बोलावून आणले जाऊन पेशव्यासी ॥ परमुलुख परगाणा दिला मोंगलासी ॥ झाडून ठाणीं बसविलीं पेशव्याचीं ॥ तीन दल मिळाले गर्दी मुलकाची ॥ लाल सवाई उडती भगव्या बाणाची ॥ आपण पोंचला शार बेंगरुळासी ॥ मिळवणी ॥ पैले दिवशी दिलें एक झूज उडविला धूर पळून मग गेला पटणासी ॥ खुब मार दिला देवडी लावून हबसी ॥१॥
घेतलें शार बेंगरूळ धरून किल्लेदार खबर पाठविली पटणाला ॥ टिपू म्हणे आज हैदर नाईक मेला ॥ सनयेस सनय भिडवली फिरंगी किल्ली बोली किलबिली आतां उमजेना कवणाला ॥ खुब मार दिला मुरद्यानें खंदक भरला ॥चाल॥ बसविलें आपलें ठाणे गेला चालून लावून दुर्बीन पाहिले मोती तळ्याला ॥ वर्मासी वर्म भेटला धाक पडला ॥ तो मेंढा फिरंगी ह्ममईहून आला ॥ सुलतान बचेर्‍या जाऊन तुडविला ॥ सा हजार बार टिपूजा झडला ॥ चार हजार फिरंगी गोरा तिथ मेला ॥ त्या लालबागेचा धूर उडवून दिला ॥ तोफा टाकून माघारा पळून गेला ॥ होऊनी चाल दोन पारी खर्‍या दोपारी मध्याण रातरी गोरा फलटाण होऊन तयार लुटले शार गंजीपाला ॥ पटणांत वळखिना माय लेंकराला ॥२॥
फिरंगी मनसोबा निवळ, टिपूला खवळ, फिरंगी बळ, झाले भारी ॥ त्याने बुधले पुरले पलंगाशेजारीं ॥ मातेने घातले भरी ॥ वडलांची हाडें सोडून कुणीकडे एकदांच वांचवावी नगरी ॥ म्हलांत मेली खाशी अस्तुरी ॥ त्याची आईकतांच शुद्ध गेली सारी ॥ त्यानें पत्रें लिवली भोवीत्या करीं ॥ पाठवून दिलीं तात्याच्या कचेरी ॥ वाचून पहातां माया आली उदरीं ॥ ‘वडलानें तारलें होतें समय शिरीं ॥ आता तुम्ही वांचवा दौलत तुमची सारी ॥ देतों मोंगलाचा परगाणा काम लहरी ॥ लष्करांत महागाई पडली दो शेरी ॥ झाली चौकडून कुमका तारणारा हरी ॥ चाल ॥ गांवासी तीन तट किल्ला बळकट फिरंगी धीट भीत नाही आपल्या मरणासी ॥ राहुटया नेहून भिडविल्या आरोब्यासी ॥३॥
लागले सल्ल्याचे तोंड फिरंगी मोंड वेढा उठविना आपला ॥ पाहीन म्हणतो एकदा पटणाचा वाडा ॥ वर वाजवीन तंबूरा जरा धीर धरा बांधवीन घरें बाळगीन सवा लाख घोडा ॥ तो हरिपंत तयाचा मनसोबा गाढा ॥ हाय मुसलमान या उभी असू दे सुभी दावतो खुबी मुसलमान वेढा ॥ घरीं बसल्याने पैशाचा करील झाडा ॥चाल॥ भ्रमाचा भोपळा नका तुम्ही फोडा ॥ मारला चंद्रपठाण बैजवाडा ॥ नऊ क्रोड रुपये खंडणी केली झाडा ॥ तुंगभद्रेकडे परगाणा दिला सारा ॥ दिला लेंक हातीं मारा कीं तारा ॥चाल॥ भाऊसाहेबासी आला राग खवळला वाघ काढला माग वलांडून गेला कावेरी ॥ परतून ढाला दिल्या त्यास लहरी ॥४॥
पटण सारख्या शहरा निशाणा बरा टिपूच्या घरास वा रीझली ॥ उंच गांवांतून जागा गांवांतून होती नेमिली ॥ वर मोंगलाचे घुमट खाल जाय निट वसविली पेंठ दिली लालबाग लावून ॥ त्या करनाटकामधीं जागा पाहून ॥ सोन्याचा निघतो धूर नदीस आला पुर नाव हाय श्रीरंगपट्टण ॥ त्या मुलखामधि राव जनमतो सोन ॥चाल॥ झाले सला चालले लष्कर निघून रागीने घेतले घर जन म्हणती अशी कैक मेलीं हगवण लागून । घोडयाला चालेना ओझे नवे जिण ॥ तसल्यांत गांठ घातली राव बयद्यान ॥ फत्तु नाम गैबीचें करतो स्मरण ॥ लाडू नेमज वस्तादाची दया पूर्ण ॥ राजू सुलतानाचें मडवड ठिकाण ॥ असा छंद फंद केला पाहून ॥ ऐकून जळती दंडी दुसमान ॥चाल॥ आम्ही दालीबंद शिपाई वळखिली शाई त्या शहरांमधिं तुरेवाल्याची उपडली शेंडी ॥५॥

या पोवाड्यात सांगितले आहे. सर केला टिपू सुलतान फिरंगी बाण गवसली खाण सोन्याची सोडीना फिरंगी लालुज पटणाची थोर होऊन शान अभिमान होउनी रावण होऊनी पाच्छाई द्वाही फिरविली परगण्यासी कैदेंत घातले कुंभार राजासी महाराठ लोक ब्राह्मण नेई धरून कापी चोमण मुसलमान केले राव तयासी बारा हजार चेला जमला पंक्तीसी चौमुलुखी पडली धासत नाव कोण घेतो थोर इभ्रत तोफेची कानडे लोक फलटान केले त्यासी त्याने दावा लाविला फिरंग्यासी चाल भौवताचा वैरी टिकल फार दिवशीं बोलावून आणले.

- पारंपरिक