जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार । सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की जी मायबाप ॥ १ ॥
जिवाजीनें सारा गांव । बुडविण्याची धरली हांव । त्यासी मिळाले कामाजीराव । मग अन्याय सहजचि की० ॥ २ ॥
कामाजी बाजीस मिळाले । क्रोधाजी गांवांत सहज शिरले । लोभाजीचें ठाणें जोडले । मग विसरले धन्यासी की० ॥ ३ ॥
मदाजी बाजी तों जाहलें मस्त । त्यांनी गांव पांगविला दरोबस्त । मत्सर बावा उन्मत्त । आपआपणांत मिळाले की० ॥ ४ ॥
दंभाजी म्हणविती चौधरी । सदा बैसती आपुले घरीं । धन्याची तलब आलियावरी । गांडीवरी टोले की० ॥ ५ ॥
अहंकार पोतनीस कारभारी । ते जिवाजीस ठेविती धाब्यावरी । त्याची भरोवरी । कोण करील की० ॥ ६ ॥
याची नका धरूं संगती । तेणें तुमची न चुके पुनरावृत्ती । एका जनार्दनीं करी विनंती । संतीं ऐकावें की जी मायबाप ॥ ७ ॥
एकनाथ या भारूडात जोहार या रूपाने सांगतात. जोहार मायबाप जोहार , मी निराकाराचा महार , सांगेन अवघा विचार , जिवाजीचा की जी मायबाप. पुढे जिवाजीनें सारा गांव , बुडविण्याची धरली हांव , त्यासी मिळाले कामाजीराव , मग अन्याय सहजचि की०. शेवटी याची नका धरूं संगती , तेणें तुमची न चुके पुनरावृत्ती , एका जनार्दनीं करी विनंती , संतीं ऐकावें की जी मायबाप.
- संत एकनाथ