प्रार्थना

असो तुला देवा

साने गुरुजींची प्रार्थना.

असो तुला देवा माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार

तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा माझा सदा नमस्कार

तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधुपार
असो तुला देवा माझा सदा नमस्कार

तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो शतजन्मांची मत्तृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया बघत बघत दार
असो तुला देवा माझा सदा नमस्कार

- साने गुरुजी, धुळे तुरुंग, मे १९३२