प्रार्थना

प्रभु माझी जीवनबाग

साने गुरुजींची प्रार्थना.

प्रभु माझी जीवनबाग सजव
कुशल तू माळी बाग सांभाळी
स्वर्गीय सौंदर्ये ती रे खुलव

गत काळातील सगळा खळमळ
भरपूर येथे खताला सडव
प्रभु माझी जीवनबाग सजव

द्वेष मत्सर हेची फत्तर फोडून
प्रेमाचे वृक्ष फुलव
प्रभु माझी जीवनबाग सजव

मोह विकार बाग खाणार
वैराग्य-दंडाने त्यांना घालव
प्रभु माझी जीवनबाग सजव

तव करुणेचा मंगलतेचा
शिवतम वसंतवारा वाहव
प्रभु माझी जीवनबाग सजव

दृढ श्रद्धेचे सद्भक्तीचे
सुंदर मांदार येथे डुलव
प्रभु माझी जीवनबाग सजव

उत्साहाची आनंदाची
थुइथुई कारंजी येथे उडव
प्रभु माझी जीवनबाग सजव

धृताचे अभिनव घालून मांडव
त्यावर शांतीचे वेल चढव
प्रभु माझी जीवनबाग सजव

चारित्र्याचे पावित्र्याचे
शीतल शांतसे कुंज घडव
प्रभु माझी जीवनबाग सजव

सत्प्रतिभेचे सतज्ञानाचे
गुंगूगुंगू मिलिंद गुंगव
प्रभु माझी जीवनबाग सजव

सहजपणाचे सतस्फूर्तीचे
करू देत विहंगम गोड रव
प्रभु माझी जीवनबाग सजव

परमैक्याचा झोला साचा बांधून
त्यावर जीव झुलव
प्रभु माझी जीवनबाग सजव

फुलवून जीवन तेथे निवसून
मग गोड गोड तू वेणू वाजव
प्रभु माझी जीवनबाग सजव

- साने गुरुजी, धुळे तुरुंग, मे १९३४