मन वढाय वढाय
उभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
मन मोकाट मोकाट
त्याले ठायीं ठायीं वाटा,
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावर्हल्यारे लाटा.
मन लहरी लहरी
त्याले हातीं धरे कोन?
उंडारल उंडारलं
जसं वारा वाहादन.
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर,
आरे इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन पांखरू पांखरूं
त्याची काय सांगूं मात ?
आतां व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायांत.
मन चप्पय चप्पय
त्याले नहीं जरा धीर,
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर.
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना,
मन केवढं केवढं ?
त्यांत आभाया मायेना.
देवा, कसं देलं मन
आसं नहीं दुनियांत !
आसा कसा रे यवगी
काय तुझी करामत !
देवा, आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनीं तुले
आसं सपन पडलं !
बहिणाबाई मनाला उभ्या पिकात शिरलेल्या ढोरासारखे म्हणतात. किती हाकलले तरी ते पुन्हा पिकावर येते. ते मोकाट आहे. त्याला ठायीठायी वाट सापडते, वाऱ्याने पाण्यावर उठलेल्या लाटांसारखी. ते लहरी आहे, हातात धरत नाही, वाऱ्यासारखे उंडारते. त्याचे विष निराळे आहे. साप बरा, कारण त्याला मंत्राने उतरावे. हे मन पाखरू आहे. आत्ता भूईवर होते, आणि क्षणात आभाळात गेले. त्याला धीर नाही. एकदा वासरात बसले की क्षणात धरतीवर येते. मोहरीच्या दाण्याएवढे मन आहे, आणि त्यात आभाळ मावत नाही. देवा, असे मन जगात दुसरे नाही. जागेपणी हे स्वप्न कसे पडले.
- बहिणाबाई चौधरी